Tuesday, 17 October 2017

दिवाळी स्पेशल

दिवाळीतील फडके रोडवरच्या आठवणी


दिवाळी पहाट........


मी स्वतः एक डोंबिवलीकर आहे आणि गेली कित्येक वर्ष मी फडके रोड ला दिवाळी पहाट च्या दिवशी तेथे जात असतो खरं तर सगळ्यांच्या खूप आणि न संपणाऱ्या आठवणी या फडके रोड शी जोडलेल्या आहेत, मी पण त्यातील एक

अगदी लहानपणी इतका समजायचं नाही पण नववी मध्ये असल्यापासून आम्ही स्वतः मित्र मैत्रीण फडके रोड ला जातो तिथे असणारी तरुणाई, नव-नवीन कपडे आणि ट्रेंड सोबत मज्जा मस्ती करणारे तरुण आणि मुख्य म्हणजे दिवाळी पहाट साजरी करणारी डोंबिवली. सर्वप्रथम डोंबिवलीकरांचे आराध्य दैवत "फडके गणपती" मंदिरात जाऊन बाप्पाच्या दर्शनाने होणारी सुरुवात पुढे आगरकर रोड आणि टिळक रोड वरील चौकात येणारे सिनेकलाकार,भव्य दिव्या रांगोळ्या आणि ढोल-ताशे या द्वारे जपली जाणारी आपली मराठमोळी संस्कृती पाहून फार मज्जा येते गेली २ वर्ष मी डोंबिवली मध्ये राहत नाही तरी ही दरवर्षी न चुकता "दिवाळी पहाट" आणि "गुढीपाडवा" या दोन्ही दिवशी मी आवर्जून जातो आणि तिकडे जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून अगदी प्रसन्न वाटत आणि अर्थात जे डोंबिवली मध्ये आहे ते कुठेच नाही त्यामुळे संस्कृती च्या या माहेरघरात जाऊन नेहमी अभिमान वाटतो एक डोंबिवलीकर असल्याचा

- तन्मय जंगम


____________________XXX___________


सांस्कृतिक डोंबिवली..... 


मी गेल्या २० वर्षांपासून डोंबिवलीत राहते मुळात माझा जन्मच डोंबिवलीत झाला त्यामुळे डोंबिवलीशी माझं खूप जुनं व तितकच जवळच नात आहे. शाळा-कॉलेज सुद्धा डोंबिवली मध्येच.

डोंबिवली परंपरेने,संस्कृतीने नटलेले व समृद्ध असलेलं शहर आहे.सर्वच सण डोंबिवली मध्ये मोठ्या जोशात साजरे होतात,इथे साजरी होणारी दिवाळी पहाट नौखीच असते सर्व तरुण-तरुणी एकत्र येऊन हा सण साजरा करतात,ढोल पथक दिवाळी पहाट च्या दिवशी वादन करतात.मी स्वतः आठवीत असल्यापासून म्हणजे गेल्या ६ वर्षापासून फडके रोड वरील दिवाळी पहाट ला जाते माझ्या शाळेतले मित्रमैत्रिणींसोबत पारंपरिक वेशात हा सण साजरा करतो आणि आता मी स्वतः ढोल पथकात असल्यामुळे ढोल वाजवून स्वागत यात्रेत आणि दिवाळी पहाट च्या दिवशी सण साजरा करते. हे सर्व या पुढे ही असंच चालु राहील.

- श्रुती बोबडे


फडके रोड दिवाळी क्षणचित्रे 

____________________XXX___________


फडके रोड तरुणाई ने नेहमीच भरलेला असतो परंतू दिवाळी पहाट ला जणू सुमद्राला भरती यावी तसा तरुणाचा घुमणारा  आवाज तरुणांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. माझी तर पूर्ती तारांबळ उडते नक्की कोणत्या ग्रुप  बरोबर जायचं?? शाळा, कॉलेज की क्लास की बिल्डिंग मधले ? बापरे ! ठरवताना नाकी नऊ यायचे पण कोणत्या ही ग्रुप बरोबर गेले तरी फडके ला एवढ्या गर्दीतही आपल्या मित्रांना कॉल करून भेटतोच. गणपती दर्शन मग मस्त गाणी ऐकायची अगदी मनात आलं तर मोकळे पणानें नाचायचं , ओरडायचं अगदी बेभान व्हायचं. आमच्यातल्या एक तरी नेहमी बकरा होतो ज्याला मग दिवस भर प्रत्येक गोष्टीत चिडवायचं आणि त्यात कोणाच लग्न ठरलं असेल तर त्याला चिडवून चिडवून पार लाजवून टाकायचं. या सर्व उनाडक्या करून जबरदस्त भूक लागते मग स्वारी निघते मॉडेन कॅफे हॉटेलला बरं  या हॉटेल ला जायचं म्हंटल की तास भर वेटिंग करा पण तिथेच जायचा हट्ट ही असतोच. त्या दिवशी सिरीयस गप्पा बिलकुल होत नाही फक्त होतात ते मनापासून एकमेकांना भेटणं , हसवणं आणि निघताना घट्ट मिठी मारून पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेणं..
वर्ष भर एकत्र भेटणं कमी होत पण भेटलो की मनसोक्त भेटतो...गेले अनेक वर्षे फडके रोड आमच्या सारख्या अनेक मित्रमैत्रिणीच्या मैत्रीची साक्ष देत आहे.

- नमिता दोंदे

 ____________________XXX____________


डोंबिवलीत दिवाळी + फडके रोड = मित्रमैत्रिणींचा गोतावळा हे जणु समीकरणच बनले आहे. दिवाळी पहाटेला अभ्यंग स्नान करुन पारंपारिक वेशभुषेत नटलेली तरुणाई गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन अतिशय उत्साहात एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा.. देत असतात. हे चित्र दरवर्षी गुढीपाडवा आणि दिवाळीच्या निमित्ताने पहायला मिळते. हे चित्र पाहुन एक वेगळाच उत्साह येतो. फडके रोड ला तर पाय ठेवायलाही जागा नसते एवढी गर्दी असते तरुणांची. कधीही न भेटलेले ज्यांच्याशी कधी बोललेलो नाही असे शाळा-काॅलेजचे मित्र मंडळी यावेळी मात्र थांबुन चौकशी करुन जातात याचं मात्र दरवर्षी मला आश्चर्य वाटतं. गप्पा-गोष्टी, पार्टीच्या नावाखाली एकमेकांना लुटणं, सेल्फी, एकमेकांची टर उडवणे इ. अनेक गोष्टी आम्ही दिवाळीला फडके ला भेटुन करतो. याबरोबरच रस्त्यावरच्या संस्कारभारती रांगोळ्या तसेच ढोल ताशाच्या आवाजाने तर पाय आपोआप थिरकायला लागतात. एवढ सगळं झाल्यावर हाॅटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव न मारला तर नवलच. अशी ही आमची फडकेवरची दिवाळी म्हणजे आठवणींची शिदोरी...
- प्राजक्ता पेंढारकर

____________________XXX____________



तरुणांचा सळसळता उत्साह, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेला मित्र-मैत्रिणींचा गोतावळा सोबत ढोल ताशाची साथ आणि त्यावर थिरकायला लावणारी पावले... अहाहा ! फडके रोडवरचे दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिसणारे दृश्य माझ्या मनाला खुप भावते. व्हाॅट्सप, फेसबुकच्या जगात वावरताना सुद्धा एकमेकांना प्रत्यक्ष भेटुन त्यांची ख्याली खुशाली विचारण्यातला खरा आनंद आजही आम्ही विसरलेलो नाही याचीच ही जणु साक्ष आहे. आता नाही म्हणायला त्यासाठी काही सण-समारंभ, पार्टी यांची गरज असते. परंतु एकमेकांना भेटण्यासाठीच सगळे प्रयत्न करत असतात हे मात्र अगदी खरे..! एकदा तरी आमच्या या फडके रोडला गुढीपाडवा आणि दिवाळीला भेट देऊन तर बघा... मग बघा तुमचा पाय तेथुन हलणारच नाही. सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...! 

- सायली परांजपे





No comments: