प्रसिद्धी न्यूज बीट

अभ्यासाची, यशाची नशा करा, स्वतःला जपा

अभिनेता देवदत्त नागे यांचा तरुणाईला संदेश

   



दारू, सिगरेट, ड्रग्स अशा अंमलीपदार्थांपासून दूर रहा. मी स्वतः अभिनय क्षेत्रात असून दारू, सिगारेटपासून स्वतःला दूर ठेवले आहे, याचा मला अभिमान आहे. अभ्यासाची, यशाची नशा करा, चांगल्या गोष्टींची नशा करा, स्वतःला जपा, असा संदेश जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे याने तरुणाईला दिला. जागतिक अमलीपदार्थ सेवनविरोधी दिनानिमित्त अमलीपदार्थविरोधी नियंत्रण पथक, नशाबंदी मंडळ आणि अखिल भारतीय नशामुक्त अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिर येथे युवा मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.यावेळी देवदत्त नागे यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन संवाद साधला.

देवदत्त यांनी यावेळी प्रेक्षागृहात उपस्थित सर्वांना अमलीपदार्थांचे सेवन करणार नाही, अशी शपथ घ्यायला लावली. यावेळी नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरोचे डायरेक्टर कुमार संजय झा, नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विलास, चिटणीस स. भा. मडामे, केईएम हॉस्पिटलच्या डॉ. शुभांगी पारकर, माजी महापौर निर्मला सावंत-प्रभावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी चर्चासत्राच्या माध्यमातून कुमार झा यांनी पॉवर पॉईंट  प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तुम्ही चांगल्या सवयींचा अवलंब करा, नशाजन्य पदार्थांपासून दूर राहा असे त्यांनी सांगितले. तर निर्मला सावंत-प्रभावळकर यांनी अमलीपदार्थ आणि कायदा याबाबत मार्गदर्शन केले. या कायद्यांतर्गत न्यायालयात कशाप्रकारे शिक्षा होते, याबद्दल माहिती दिली. डॉ. शुभांगी पारकर यांनी व्यसनामुळे शरीरावर आणि मनावर कसे परिणाम होतात. त्याचे व्यसन सोडवण्यासाठी करण्यात येणारे उपाय याबद्दल माहिती दिली. यावेळी से नो टू ड्रग्स या विषयावर व्हॉट्सप  स्लोगन स्पर्धेचे पारितोषिक वितरण देवदत्त नागे आणि कुमार झा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास तंबाखूमुक्त शाळेचे शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन विद्यार्थी, किन्नर माँ  संस्थेचे साथी संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते याचा समावेश होता.


.........................................................................................

तृप्ती देसाई विरोधात पुण्यात गुन्हा दाखल


भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे.


काय आहे प्रकरण?


२७ जून २०१७ सकाळी ११.३० वाजता बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाईडजवळ होंडा अमेज गाडीत तृप्ती देसाई सोबत जात होते. तेव्हा प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी अर्टिगा गाडीतून येऊन तक्रारदार विजय मकासरे (वय ३३ वर्ष) यांच्यासमोर गाडी आडवी घातली. गाडी थांबवायला सांगून तृप्ती देसाईसह सर्वांनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली, असं विजय मकासरे यांनी सागितलं..

प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चैन आणि २७ हजार रुपये काढून घेतले. तसंच तृप्ती देसाई यांनी आमच्याविरोधात गेलास तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप विजय मकासरे यांनी केला आहे.

दरम्यान, हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी, रस्ता अडवणे,मारहाण करणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


.........................................................................................

जात प्रमाणपत्र खोटं आढळल्यास नोकरी, पदवी रद्द : सुप्रीम कोर्ट


शिक्षण किंवा नोकरीसाठी खोटं किंवा बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याचं आढळल्यास संबंधित व्यक्तीला पदवी किंवा नोकरी गमवावी लागेल, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. इतकंच नाही तर असे खोटारडे शिक्षेसही पात्र असतील, असंही कोर्टाने ठणकावलं.

महाराष्ट्र सरकारच्या अपील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय देत हायकोर्टाचा निकाल रद्द ठरवला.

सरकारी नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. मात्र त्याबाबत कोर्टात जाऊनही खटल्याला विलंब होत असे. त्यामुळे वरच्या कोर्टात जाईपर्यंत अनेक वर्ष गेलेली असत. त्याचा फायदा घेऊन दोषी उमेदवार अनेक वर्षे नोकरी करत असे. तसंच इतकी वर्षे नोकरी केली आहेत, जर आधीच निकाल लागला असता, तर त्याचवेळी आम्ही नोकरी सोडली असती,असा प्रतिदावाही केला जात असे.

मात्र सुप्रीम कोर्टाने आज हा सर्व खेळ थांबवत, ज्या उमेदवाराने अवैध जात प्रमाणपत्राद्वारे शिक्षण किंवा नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेतला आहे, ते तातडीने त्याच क्षणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

तुम्ही किती वर्षे नोकरी केली आहेत, ते आता विचारात घेतलं जाणार नाही, जर तुमचं जात प्रमाणपत्र खोटं आढळलं, तर त्याच क्षणी तुमची नोकरी, पदवी रद्द होईल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

तुम्ही २० वर्षे नोकरीत असाल, आणि त्यावेळी तुमचं कास्ट सर्टिफिकेट अवैध आढळलं, तरीही तुम्हाला नोकरीतून हाकलण्यात येईल. इतकंच नाही तर तुम्ही शिक्षेसाठीही पात्र असाल. त्यावेळी तुम्ही केलेल्या नोकरीचा कालावधी लक्षात घेतला जाणार नाही, असंही कोर्टाने नमूद केलं.

.........................................................................................

पर्यावरण संवर्धनासाठी जे. एम. पाटील महाविद्यालयाचा वृक्षारोपणाचा उपक्रम 


             


                

 

शहरातील प्रदूषित वातावरण शुद्ध करण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करण्याचा कार्यक्रम
बदलापूरच्या जे. एम. पाटील महाविद्यालयाने हाती घेतला. एव्हढेच नव्हे दत्तक घेतलेल्या वाघेश्वरी गावात देखील वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जे. एम. पाटील महाविद्यालय ऑफ कॉमर्स यांनी *दि. ४ जुलै रोजी* महाविद्यालय परिसरात तसेच *दि. ७ जुलै* रोजी दत्तक घेतलेल्या वाघेश्वरी गावात आयोजित केलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

दि. ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. अनेक विविध प्रकारची झाडे महाविद्यालय परिसरात लावली. *या कार्यक्रमास महाविद्ययालयाचे प्राचार्य बी. डी. रेड्डी , प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.* शिक्षकांनी विद्यार्थीमित्रांना वृक्षारोपणाचे महत्व व फायदे विशद केले.

दि. ७ जुलै रोजी जे. एम. पाटील महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या *वाघेश्वरी* गावात वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ व खेळती राहावी यासाठी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी *गावाचे सरपंच अविनाश राऊत, प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी* या सगळ्यांनी हातभार लावला. श्री. अविनाश राऊत, सरपंच यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी देखील हा क्षण चित्ररूपात साठवून ठेवला.



No comments: