परिवर्तन हा दुनियेचा नियमच आहे। चाकाचा शोध लागला आणि मानव जो धावत आहे तो अंता पर्यँत धावतच असतो। आणि हे न दिसणारे पण अविभाज्य भाग असलेले मन तर अजूनच वेगाने धावत असते पुढे पुढे। अगदी एकमेकाशी संवादाची साधनेही किती बदलली आहेत ना।कबूतराच्या पायाला चिठ्ठी लावून कबूतर जा जा असे गुणगुणत प्रियकराला निरोप देण्यापासून ते अगदी व्हाट्स अप पर्यंत। पण पञ हे पञच असते।त्या पञात स्पर्श भावना गंधाचा हळुवार मिलाप असतो।
कधीतरी आपण विचार केलात तर आपल्या लक्षात येईल की आपण शेवटचे पञ कधी लिहीले आहे। बघा विचार करा। नाही ना आठवत।।।।।।।।
आज मी माझ्या अगदी लहानपणापासूनच्या म्हणजे जेव्हा अक्षराची ओळखही नव्हती तेव्हापासूनच्या आजपर्यंतच्या माझ्या सख्याला पञ लिहिले आहे। हा माझा सखा माझ्या कुटुंबाला खूप आवडला आहे। पहा आपल्यालाही आवडतो का----
प्रिय पिवळ्या,
पिवळ्या शब्द ऐकून दचकला असशील ना। गेली कित्येक वर्षे तू आणि मी दोघेही या शब्दाला मुकलो आहोत। लहानपणी पोस्टमन काका तूला घेवून आले की मी खुशीत असायची आणि आईऽऽऽऽऽ आज पिवळ्या घरी आलाय बरं असे बोलून तुला हातात घेवून एक गिरकी मारायची। वाचता येत नव्हते पण तुझे येणच माझ्यासाठी आनंद असायचा। हळूहळू लिहिणे वाचणे येवू लागल्यावर तर आपली छानच गट्टी जमली। तुझ्या अंगावर मी किती लिहायची। तूला पञपेटीत टाकताना तुझा प्रवास सुखाचा होवो अशी पञपेटीला विनंती करायची।
एखादी आनंदाची बातमी घेवून तू आलास की हळूच तुझा मुका घेवून तूला मी जपून ठेवायची। पण त्या टोच्यात माञ तूला अडकवायची नाही। तूला दुखेल ही मनी भावना असायची। कधी कधी वाईट बातमी घेवून आलास की घरातील मोठी माणसे तूला फाडून टाकायची तेव्हा खूप वाईट वाटायचे।
मोठी मोठी होत गेले तशी तुझे इतर भावू-बहीण आंतरदेशीय, पाकीट, तार, मनीऑर्डर यांचा वापर होवू लागला पण माझा जीवाभावाचा सखा माञ तूच राहिलास।
मला माहित आहे तू खूप दु:खी झाला होतास मी विसरले म्हणून। पण मी विसरले नव्हते रे। काळाबरोबर थोडी वहावत गेली होती। पिवळ्या माझी मुलगी आता college ला आहे। computer, mobile, internet,whatsup च्या जमान्यात तिला या पिवळ्याची काय ददास। पण मी माञ तिला नेहमी तुझ्याबद्दल सांगत असते।
काही दिवसापूर्वी तुझी-माझी आपली सर्वाँची लाडकी कु.तारबाई या जगातून गेली तेव्हा खूप खूप दु:ख झाले।तिचा टक-टक-टक-टक आवाज अजूनही कानात घूमत आहे।
पिवळ्या जग खूप पुढे गेले आहे रे। आधुनिकीकरण,यांञिकीकरण ही काळाची गरजच आहे रे।पण जो आनंद तुझ्या स्पर्शाने गंधाने पुन्हा पुन्हा अनुभवयास मिळत होता ते सर्व हरवले आहे।माझे तुला एकच सांगणे आहे आपली तारबाई आपल्याला सोडून गेली पण तू माञ कुठे कुठेही जावू नकोस हा।
जास्त काय लिहू आज तुझी खूप खूप आठवण येत होती म्हणून लिहायला घेतले।
लवकरात लवकर पोच दे।
तुझ्या पञाची आतुरतेने वाट पहाणारी -------
तुझी सखी
सोनू
( सौ. रेश्मा रविंद्र मेहता )
....................................................
खरंतर आजच्या पत्राची सुरुवात कशी करू कळत नाहीये. आजवर तुला कधीच पत्र लिहलं नव्हतं.हे पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे फ्रेंडशिप डे.. फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री चा दिवस समजला जातो.कोणत्याही मैत्रीचं नातं हे सर्वात उत्कृष्ट मानलं जातं, जस तुझं आणि माझं आपलं नकळत फुललेलं नातं.
लहानपणापासून आता पर्यंत खूप तळहाताच्या फोडा प्रमाण मला जपलं- सांभाळलं आणि अजूनही जपतेच आहे. पाहिलं पाऊल टाकताना जसा आधार आणि पाठिंबा दिला तो अजूनही देत आहेस. कधीही कोणत्याही गोष्टीची परतफेड आजवर मागितली नाही..मैत्री च नातं जसं मुक्त असत कोणतही बंधन नाही तसेच एक स्वछनंदी फुलपाखरा प्रमाणे मुक्त उडायला विश्वासापोटी परवानगी तू दिलीस...हा तुझा विश्वास मी कधीच तोडणार नाही या फ्रेंडशिप डे च्या दिवशी प्रॉमिस करते...आजवर खूप गोष्टी माझ्यासाठी तू केल्यास पण कधीच त्याचा हिशोब मांडला नाहीस.
मला काही लागलं कुठं धडपडली तर लगेच माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी येणारी तू माझी पहिली मैत्रीण,
काही गोष्टी न सांगता चेहरा वाचून मनातलं ओळखणारी तू माझी पहिली मैत्रीण, एखादी गोष्ट मला नसेल करायची तर ते मला करायला भाग पडणारी तू माझी पहिली मैत्रीण, माझ्या आनंदात आणि दुःखात प्रथम हक्काने डोकावणारी तू माझी पहिली मैत्रीण, मी कधीही उलट रागावून बोलले तरी मला समजून घेणारी तू माझी हक्काची मैत्रीण. तर बाहेरून घरी येई पर्यंत काळजीने तू वाट माझी पाहणारी.
माझ्या कुठे ही जिंकण्याचा आनंद तुला झाला ते शब्दात व्यक्त न होता डोळ्याच्या कडा ओल्या होत छान अस म्हणून पाय जमिनीवर कसे राहातील तोच विचार करून कौतुक तू करणारी.
या सगळ्या बालपणीपासून ते आतापर्यंतच्या प्रवासात नकळतपणे मी तुझं मन खुपदा दुखावलं हे मला माहित आहे. प्रसंगी मी तुला रडवलं ही, त्रास दिला, हट्ट केले. पण, मी कधी तुला उघडपणे I LOVE YOU नाही म्हंटले की कधी SORRY आणि THANK YOU नाही बोलली..रोजच्या प्रवासात बाहेरच्या माणसाला लगेच सॉरी, थँक्स म्हंटले जाते पण तुला आजवर खूप कमी वेळा बोलली..
पण तरीही कोणताच रुसवा राग मनात न धरता तू तसाच जीव लावला आणि त्या पेक्षा अधिक प्रेम करतेस. याच भावनांची परत फेड म्हणून हा छोटासा माझा प्रयत्न.
म्हणून या फ्रेंडशिप डे च्या दिवशी खऱ्या फ्रेंडला म्हणजे आई तुला सर्वात पहिले खूप शुभेच्छा...
तुझीच,
(तुला आजवर त्रास देणारी)
हर्षदा
..................................................
प्रिय मैत्री,
आज तुझा दिवस ! म्हणजे तुला साजरं करण्याचा. खरंच तुला कुठल्याही celebration ची गरज आहे का गं ? वेळोवेळी माझ्या सोबत तू कोणत्या कोणत्या ना व्यक्तीच्या माध्यमातून समोर येतेस आणि आयुष्या प्रवाहाच्या त्या व्यक्तीला माझ्यापासून लांबही नेतेस आणि पुन्हा एका नविन व्यक्तिच्या माध्यमातून मला भेटतेस.
कधी कधी काही क्षणांसाठीच् येतेस पण संपुर्ण आयुष्यभर लक्षात राहिल अशी सुखद शिदोरी मागे ठेवून जातेस तर कधी संपुर्ण आयुष्यभर असतानाही काही क्षणांसाठी विसर पडावा असे अनुभव मागे ठेऊन !
पुर्वी कुठे होगं गं , हे मैत्रीचे धागे हातावर बांधण्याचं आणि मित्राचं नाव हातावर लिहायचं फॅड ? पाश्चिमात्यांकडुन आपण एक शिकलो ते म्हणजे 'फॅड' अाणि बऱ्याचदा ही फॅड दिखावेपणाचीच वाटतात.
खरंतर तुझं आणि प्रत्येकाचं नातं व्यक्तिगणिक बदलतं, पारड्यातल्या वजनाप्रमाणे ते व्यक्तीगणिक ही कमी अधिक असतंच समान असतं असं मला मुळीच वाटत नाही. काही जणं तुझ्या त्या मापाला न्याय देतात तर काही तुझं नातं जोडलेल्या व्यक्तीला पण तूला न्याय देणारे हाताच्या बोटावर मोजण्याईतकेच् !
तरीही अशा विविध वृत्तीच्या, प्रवृत्तीच्या, प्रकृतीच्या माणसांना तुझ्या अदृश्य दुव्याने कायम बांधुन ठेवण्याच्या आणि वेळप्रसंगी तोच् दुवा तोडण्याच्या तुझ्या अफाट मानसिक ताकदीला माझा साष्टांग नमस्कार
पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात तुझ्या दुव्याने जोडल्या गेलेल्या आणि तुटल्या गेलेल्यांचं स्मरण मला करता आलं हेच् तुझ्या दिनाचं औचित्य !
तुझाच्
मित्र
प्रथमेश शिरसाट
..................................................








No comments:
Post a Comment