लेख / कथा











 कविता तसेच लेख हृदयांतर ब्लॉग. कॉम मध्ये प्रसिद्ध करण्याची अनुमती कवयित्री आणि लेखिका मा. मीनल सबनीस यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक धन्यवाद ! तसेच येत्या महिनाभर त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रकाशित किंवा  अप्रकाशित विशेष कविता, लेख या ब्लॉग द्वारे वाचकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न करीत आहोत.






मन मानसी या फेसबुक पेजवरील ठराविक लेख, कविता या ठिकाणी वाचू शकता. 


मीनल सबनीस 

हे भलते अवघड असते....


असं म्हणतात अव्यक्त प्रेम हे जितकं त्रास देणारं असतं तितकंच ते छान आणि लोभसवाण देखील असतं. हुरहूर आहे , झुरणं आहे , संकोच आहे आणि त्याहीपेक्षा मनात नकाराची भीती आहे अशा भावनेतून ह्या अव्यक्त प्रेमाचा प्रवास सुरु होतो. काही लोक धारिष्ट्य करून मनात असलेल्या भावना त्या व्यक्तीला सांगून मोकळे होतात.काही सकारात्मक प्रतिसाद घेऊन मागे येतात तर अनेकदा " अरे / अग मी तुला फक्त माझी एक छान मैत्रीण किंवा मित्र समजतो त्यामुळे तू प्लिज असा काही भ्रम मनात बाळगू नकोस " अशा शब्दांची सोबत घेऊन माघारी परतावं लागतं. काही काळ दुर्मुखलेला जातो खरा पण नंतर मन नवीन नात्यात गुंतवत आणि ते सावरून पुढे जातात. 

खरी कसौटी तेव्हा असते जेव्हा मन खरोखरीच गुंतलेलं आहे पण त्यानेच गुंता अधिक वाढलेला असतो .... ते व्यक्त होऊ पहात पण आपण ते व्यक्त होऊ नये ह्यासाठी धडपडतो कारण ज्याला सांगायचं तो बेफिकीर आहे,सोबत आहे पण आपल्याला त्याच्या सहवासाची असलेली ओढ त्याला कळत नाही किंबहुना मनात चाललेली खळबळ,अस्वस्थता त्याची जाणीवच त्याला नाही.अशा वेळी डोळ्यांना आपल्या नियंत्रणात ठेवणं ह्यासारखी तारेवरची कसरत कुठेली असेल बरं ? चुकूनही मनातील भाव व्यक्त होऊ नयेत म्हणून डोळ्यांनी ओढलेली पापण्यांची दुलई ... कितीतरी त्या नजरेखाली दडलेल व्यक्त होण्यासाठी आतुर पण..... 
आपण जे करतो ते मैत्रीपोटी असा त्यांचा समज तर आपल्या प्रत्येक कृतीला प्रेमाचा असलेला स्पर्श त्यांनी समजून घ्यावा अशी वेडी आशा... ...कधी कधी ही धडपड ... धडपडत रहाते...

हा पहिल्या प्रेमाचा स्पर्श असेल तर ही अव्यक्त हुरहूर आयुष्यभर तशीच रहाते. वाटत निदान एकदा तरी सांगायची हिंमत दाखवायला हवी होती तर दुसरीकडे वाटत बरं झालं व्यक्ती झालो नाही कदाचित आलेला नकार जिव्हारी लागला असता आता निदान त्या प्रेमाच्या आठवणीत तरी मन हळवं होत तेव्हा ते दुखी झालं असतं.

आपल्या आयुष्यात खूप सारी नाती अशीच अपूर्ण रहातात.... काही सांगायचं असतं पण बोलता येत नाही. कधी संधी मिळत नाही तर कधी सांगण्यासाठी लागणार धारिष्ट्य आपल्यात नसत. इथे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही भावना येतात. एखाद्याचा वाटणारा तिरस्कार , राग त्याच व्यक्तीला सांगणं जेव्हा जमत नाही तेव्हा ती बोचरी सल मनात रहाते आणि मग ती इतरांकडे सतत टीकेच्या रूपात व्यक्त होते... तिचा निचरा होत नाही.

शेवटी प्रेम असू दे की राग भावना मोकळ्या झाल्या की आयुष्यही मोकळा श्वास घेत..... नाही तर एक घुसमट आपण आयुष्यभर अनुभवतो. मुखदुर्बळ असण्याची ही एक शिक्षाच असते.... पण तरीही हे भलते अवघड असते हे देखील तितकंच खरं आहे......

                                                                                   
- मीनल सबनीस


____________xxx____________ 

अनुत्तरीत 

कधी कधी असं होत एखादी व्यक्ती तुमच्याकडे तिची व्यथा मांडत असते आणि नकळत तुम्ही तिच्या ठिकाणी स्वतःलाच बघू लागता मीन्स तेच अनुभव तुम्हालाही येतात पण तुम्ही इतका गंभीरपणे त्याचा विचार कधी केलेला नसतो . आजकाल माणसांमधे आतून एकटेपण वाढायला लागलंय खरं पण ह्याला कुठेतरी आपणच जबाबदार नसतो का ? आपण जोडलेल्या नात्यांप्रती किती प्रामाणिक असतो ? पर्याय मिळाल्यावर ज्यांचा विसर पडतो त्यांच्याप्रती आपली असंवेदनशीलता माफीच्या योग्यतेची असते का ?असे अनेक प्रश्न मनात येतात पण उत्तर मिळत नाही 

श्रीकांत गेले कित्येक दिवस कॉन्टॅक्ट मधून गायब झाला होता. वाढदिवसाचा फोन देखील पठ्याने उचलला नाही. आणि काल अचानक साहेबांचा फोन आला. नंबर वेगळा होता त्यामुळे पहिला कॉल रिसिव्ह केला नाही पण पुन्हा आल्यावर नाईलाजाने उचलला तसा समोरून आवाज आला " हाय माऊ कशी आहेस ?" आवाज ओळखायला वेळ लागला नाही त्यामुळे मी थोडीशी चिडूनच बोलले " आज आठवण आली तुला माझी ? नक्कीच काहीतरी काम असणार " त्यावर त्याचा दुखावलेला स्वर आला " ए प्लिज असं नको बोलूस यार ... आज भेटतो तुला मग बोलू " आणि दिलेल्या वेळेप्रमाणे त्याची भेट झाली. 

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तसा अचानक म्हणाला " यू नो माऊ शब्द देणं आणि शब्द पाळणं ह्या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. मला इतके वाईट अनुभव आले ना ग की माझा आता कुणावर विश्वासच उरला नाही.... सगळ्यांना स्वतःच मोठेपण सांगण्यासाठी , दुःख हलकं करण्यासाठी खांदे हवे असतात. ह्यांचा मोठेपणा ऐकून कान किटून जातात पण कसं दुखवायचं म्हणून आपण ऐकत जातो. मग ही लोक त्याच मोठेपणातून आपल्याला शब्द वैगरे देतात पण त्यातला एकही शब्द पाळत नाहीत. 

मला सुरवातीला खूप वाईट वाटायचं पण आता माणसं कळायला लागली आणि निदान तिथे तरी मी सुधारलो असं म्हणायला हरकत नाही. तुलाही फार सवय आहे ज्याच्या त्याच्या दुःखाचं सांत्वन करायची ती सोडून दे... ही मंडळी सुखी झाली की आपली साधी आठवण देखील ठेवत नाहीत......काही दिवसापूर्वी एका विचित्र फेजमधून मी गेलो आणि सगळं व्यर्थ वाटायला लागलं... मुखवटे घेऊन जगणारी माणसं त्यांचं बोलणं , शब्द सगळ्याचाच वीट आला. कुणाला तोडता येईना की स्वतःला ह्यातून सावरता येईना मग घेतला एक ब्रेक... पुन्हा रुजू झालो पण ह्या वेळेस शहाणा होऊनच.... वाईट एकाच गोष्टीच वाटत आपल्या चांगुलपणाचा , विश्वासाचा गैरफायदा घेणारे कधीतरी आत्मपरीक्षण करत असतील का ? आता मी खूप शांत असतो. कुणी दुःख सांगो की सुख मी लक्षच देत नाही. ह्याच्या वेळेच्या प्रमाणे आपला वेळ घेणारे हवेत कशाला ? त्यापेक्षा तो वेळ स्वतःसाठी द्यावा.आपली वेळ असते तेव्हा कुणीच उपयोगी पडत नाही हे लक्षात आलंय आता.. दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करावा पण तो करताना स्वतः दुःखी होणार नाही ह्याची काळजी मी घेतली नाही. पण आता ह्या सगळ्या नकारात्मकतेतून मी माझी प्रयत्नपूर्वक सुटका करून घेतली. लोकांकडून अपेक्षाही नकोत आणि अपेक्षाभंगाचं दुःखही नको....बरोबर ना ?" श्रीकांतने जे सांगितलं ते ऐकत असताना माझ्या मनात विचार आला खरंच की आपल्याही भावनाशील स्वभावाचा फायदा घेणारे , दुःखाच्या काळात आठवण आणि सुखात आपल्याला विसरणारे अनेक आहेत. खूप वेळा मी देखील हर्ट झाले. माणूस म्हणून माझ्याही काही मर्यादा आहेत ह्याचा विसर पडला गेला. पण मी का नाही असा विचार करून त्यातून बाहेर पडू शकले ? अजूनही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. एक मात्र खार श्रीकांतने वेळेतच स्वतःची चूक सुधारली. स्वतःच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यासाठी जगण्याची उर्मी अनेकदा तुम्हाला क्लेशदायीच ठरते .... 


                                                                              - मीनल सबनीस


____________xxx____________ 



मीनल सबनीस 



प्रिय सखी

खूप दिवस झाले तुझी आठवण सतत मनात रेंगाळत असते. कुठे असशील ? काय करत असशील ? माझी आठवण तरी तुला असेल का ? असे अनेक प्रश्न पण त्या प्रश्नांची उत्तर द्यायला तू मात्र समोर नाहीस. थोड कठोरपणेच दूर केल तुला. पुढे जाण गरजेच होत. कुठेतरी तुझ्या असण्याची सवय मोडायची होती. पुढे जाताना मागे वळून बघायचं नाही अस ठरवलं होत. पण माहित नाही हे एकाकी चाफ्याच फुल बघितलं आणि तुझी खूप आठवण येऊ लागली. तू फुल वेडी तुझ्याच आवडीचा चाफा पण तुला फुल तोडायला मात्र कधी आवडायची नाहीत . खाली पडलेल्या चाफ्याच्या फुलांना वेचताना तुला बघण हा वेगळाच आनंद होता. लहान मुलांच्या चेहऱ्यावर असलेली ती निरागसता त्या क्षणी तुझ्यात दिसायची. वाळूवर रेघोट्या ओढताना किती बोलू किती नको अस व्हायचं तुला ....खूप काही सांगूनही पुन्हा निघताना काहीतरी सांगायचं राहील अशी चुटपूट असायची. माझ्या वेदना इथेच तुझ्यापाशी मोकळ्या व्हायच्या, तुझ्या आश्वासक स्पर्शाने पुन्हा उभा राहिलो होतो. 

पण शेवटी एक स्वार्थी जीव म्हणूनच जगलो. तुझ्या हळुवार मनालाही माझी व्यावहारिक कठोरता झेलणं जमलं नाही आणि तू अकालीच कोमेजून गेलीस तुला आयुष्यातून वजा केल आणि बेरजेच गणित चुकत गेल. आजूबाजूला फक्त कोलाहल होता पण त्यात आनंदाचे सूर नव्हते. पैशाच्या , माणसांच्या गर्दीत माझ्यासाठी अशी साद आता कुणी देत नाहीकारण आता मी कुणाचाच उरलो नाही 

आता एकांत हवाहवासा वाटतो. तू असताना ज्या एकटेपणाला घाबरत होतो त्याचीच सवय आता झाली आहे. तुला काहीच देवू शकलो नाही. तुझ्या हक्काच प्रेम देखील देताना तू याचकच आहेस असा भाव असायचा. जे थोडे क्षण मिळायचे त्यातच तुझ खुश असण कधी कधी हेवा वाटायचा तुझा. अल्पसंतुष्ट होतीस.तुझा आनंद मी होतो आणि नेमक मीच तुला माझ्यापासून दूर केल. जाताना म्हणालीस "आता आयुष्य आहे म्हणून जगायचं , तुला माझी आणि मला जगण्याची गरज आता संपली आहे"....पुढे तू कधी दिसली नाहीस. नवे डाव मांडताना व्यवहार पाळले पण त्यात तुझा उदास चेहरा नेहमीच दिसायचा...वाटायचं काय करत असशील ...आपल्या नात्याला न्याय देऊ शकलो नाही ही खंत अजूनही आहे. तुला एकाकी करताना मीही आतून एकटा झालो हे तुला सांगायचं होत पण शब्द ओठातच विरले. अनेकांच्या अधुर्या राहिलेल्या कहाण्या त्यातच एक अधुरी कहाणी तुझी आणि माझी ... सार काही मिळूनही अखेर रीती ओंजळ माझी .............

- मिनल सबनीस



____________xxx____________



" मयूर विषय सोडून दे आता ... माफ कर तिला , अरे अजून किती दिवस मनात राग धरून रहाणार आहेस. त्याने तूच अपसेट होतोस .. ती तिच्यामार्गे गेली तू तिथेच अडकून राहिला आहेस ... त्याच त्याच गोष्टी उगाळून काही होणार आहे का ? " माधवी मयुरेशला समजावत होती. कदाचित ते मयुरेशला पटत नसावं तो फटकन तिला म्हणाला " सल्ले देणं खूप सोपं असत ग पण ज्याचं जळत त्यालाच कळत...माधवी नुकसान फक्त पैशाचं नसत भावनिक पण असत ...सोड तुला नाही कळणार. प्रॅक्टिकल माणसं नाही समजू शकत हे " आणि तो विषय तिकडेच संपला.

माधवी आणि मी निघालो तशी ती म्हणाली " मी काय चुकीचं बोलले. अग त्याचा प्रेमभंग झाला. तिने अक्षरशः फसवलं त्याला... त्याच्याच मित्राशी संधान बांधलं आणि लग्न करून मोकळी पण झाली आणि हा अजूनही झुरतो आहे .. किती समजावलं तरी ऐकतच नाही. तीच नाव काढलं की तिळपापड होतो त्याचा वाटेल ते बोलायला लागतो.. पूर्वी आमच्या स्टाफमध्ये होती त्यामुळे कधीतरी उल्लेख होतोच....कठीण आहे यार ह्याच.... तुला काय वाटत मिनू ? " मला थोडाफार विषय कळला पण माझं मत मी द्यावं की नाही हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. 

पण माधवीने आग्रह केला तेव्हा मी तिला म्हंटल " एक सांगू का माधवी तुझं समजावणं , तुझा उद्देश दोन्ही बरोबर आहेत पण अग प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आपल्याला जे बरोबर वाटत , पटत ते दुसऱ्याला पटेलच असं नाही आणि खरं सांगू का उपदेश करणं खरंच खूप सोपं आहे पण जी व्यक्ती त्या यातनांमधून जाते , जे भोगते तिलाच त्याची तीव्रता माहित असणार ना ?. शरीरावरच्या जखमा भरून येतात पण मनाला खोलवर झालेली जखम सहसा नाही भरून येत आणि ती जर प्रेमात कुणी केलेला विश्वासघात असेल तर नाहीच नाही ... दुःख आणि सल ह्यात हाच तर फरक आहे. दुःखाचा विसर पडू शकतो. कालांतराने त्याची तीव्रताही कमी होते पण ' सल '... त्याची गोष्टच वेगळी आहे. मनात रुतलेल्या काट्यासारखी ती सतत आपलं अस्तित्व दाखवत रहाते. त्या गोष्टीविषयी कितीही बोललं तरी दुःख कमी होत नाही. मला वाटत मयूरच तेच झालं आहे. माधवीने केलेला विश्वासघात सामान्य नाही. त्याच खूप प्रेम असावं तिच्यावर म्हणूनच तो इतका दुखावला आहे. त्याच दुःख कमी करण्याचा मार्ग त्याला अजून सापडत नाही त्यामुळेही असेल तो इतका भडकतो. विषयच काढू नका निदान तो असताना... भविष्यात कुणी त्याच्यावर मनापासून प्रेम करणार त्याला मिळालं की कदाचित फरक पडेल... तेवढा वेळ त्याला द्यायला हवा... शेवटी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे... काही दुःखावर औषध नसत...त्यामुळे नको समजावूस त्याला ... तो होतोय मोकळा तर होऊ दे " मी बोलत असताना माधवी मधेच म्हणाली " खरं आहे ग तुझं मी हा विचार केलाच नाही ... खोटं कशाला बोलू मी देखील वेगळ्या प्रकारे ह्या दुःखातून गेले आहे. ती सल जाता जात नाही पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा एकमेव उपाय मी करते... मी नाही बोलणार ह्यापुढे ..." असं म्हणून मी आणि माधवी दोघीही बाय करून निघालो . परत येताना मनात मयूरचा विषय घोळत होता म्हणून तो तुमच्यासमोर मांडला. काही दुःखांना सहानुभूती नको असते , सांत्वन नको असत , सल्ले नको असतात कारणं कुठल्याही परिस्थितीत त्याची तीव्रता कमी होणारी नसते म्हणूनच कदाचित तिला " सल " असं म्हणतात ......

- मीनल सबनीस








2 comments:

Unknown said...

Inspiring short story by Dr. Swati Gadgil !
I appreciate the efforts taken by all of you.
Congrats and best wishes !

Sayali said...

धन्यवाद !