राजेंद्र गायकवाडाचं औद्योगिक साम्राज्य
अनुसयाबाई आणि शंकर गायकवाड यांच्या पोटी ५ मुलं आणि एका मुलीचा जन्म झाला. त्यातील राजेन्द्र हे चौथे. १९७२ चा प्रचंड दुष्काळ पडला. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात भीषण परिस्थिती होती. उपासमारीमुळे गुरं, माणसं मुंग्यांसारखी पटापटा मरत होती. शंकरराव आणि अनुसयाबाई पोरांना घेऊन दोन वेळच्या अन्नासाठी पुण्यात आले. आता कुठेतरी स्थिरस्थावर होणार असे वाटत असताना शंकररावांचा मृत्यू झाला. त्यावेळी राजेन्द्र ७ वीत होता. तीन वर्षांनी राजेन्द्र दहावीत असताना आईचं पण निधन झालं. राजेन्द्र आणि त्याची भावंडे पोरके झाली. मोठे भाऊ लहान भावांचा सांभाळ करु लागले. एकमेकांना सांभाळत वाढू लागले. दहावीपर्यंत पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण झालं. ११ वी, १२ वी शाहू कॉलेजमध्ये पूर्ण झालं. शाळेत शिकत असल्यापासूनच उरलेल्या वेळेत राजेन्द्र काम करु लागला. कधी हॉटेलात भांडी घासायचं काम तर कधी गुऱ्हाळात मजूराचं काम. कधी रिक्षा धुण्याचं काम तर कधी भिंती रंगविण्याचं तो काम करु लागला. पुढे बी.कॉमला जायचं होतं. मात्र कामामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
पुढे विठ्ठलराव गाडगीळांच्या भावाकडे नोकरी मिळाली. त्यांच्या भावाची धुम्रफवारणीच्या मशिनची कंपनी होती. येणाऱ्या ग्राहकांना त्या मशिनची माहिती द्यायची, प्रात्यक्षिक दाखवायचं असं ते काम होतं. १२० रुपये महिन्याला पगार मिळू लागलेला. या नोकरीमुळे हेल्थ इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्या ओळखी झाल्या. मनमिळावू स्वभावामुळे राजेन्द्रासोबत कोणाचीही मैत्री सहज होत असे. नोकरीत मन रमत नव्हतं. राजेन्द्राने ओळखीने रिक्षाचं परमिट मिळवलं. काही काळ रिक्षा चालवली. मात्र रिक्षाचालक म्हटलं की हेटाळणीचीच वागणूक मिळायची. मग रिक्षा चालवणं सोडलं. रद्दीचं दुकान चालवलं. त्यानंतर सायकल स्टॅण्ड चालविला. धुम्र फवारणी मशीन दुरुस्तीचा व्यवसाय केला. हा व्यवसाय करताना खोपोली आणि पुणे महानगपालिकेत कामे मिळाली. सॅनिटरी इन्स्पेक्टर गोसावींच्या ओळखीने बजाज ऑटो मध्ये औषध फवारणीचं काम मिळालं. आकुर्डीला जावं लागायचं. खिशात पैसा नसल्याने विदाऊट तिकीटच जावं लागे. टिसीला घाबरत घाबरत ट्रेनमध्ये चढणं आणि घाबरत उतरणं असा सारा खेळ चालू होता. कधी कधी तर शिवाजी नगर ते दत्तवाडी असा ५ किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागे.
असं सगळं चाललेलं असताना एका पोल्ट्री फार्म मध्ये उंदीर मारण्याचं काम मिळालं. काम चोख केल्याने आणखी २ पोल्ट्र्यांची कामं मिळाली. कामं वाढल्याने २ माणसे ठेवली. जशी कामे वाढली तशी दोनाची चार माणसे वाढली. काम मिळत होती पण पैसे वेळेवर मिळत नव्हते. पैसे मिळणार हे नक्की होतं पण पगार, औषधांसाठी पैसा हवा म्हणून २५ टक्के व्याजाने कर्ज काढलं पण कामे पूर्ण केली. पुण्याच्या आसपास सगळ्या पोल्ट्रीची कामे राजेन्द्रच्या कंपनीलाच मिळू लागली. दरम्यान लग्नाचं वय झाल्याने मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरु झाला. मात्र मुलगा झुरळं- ढेकणं मारतो अशा व्यावसायिक समजामुळे मुलींच्याकडून नकारच मिळत असत. शेवटी एक स्थळ आलं. मुलगा काहीही करुन आपल्या मुलीचं पोट भरेल हा विश्वास आल्यावरच मुलीच्या वडलांनी मुलीचा हात राजेन्द्रच्या हातात दिला. आता दोनाचे चार हात झाल्याने प्रवास वेगाने करणे गरज झाली.
याच काळात राष्ट्रीय सुरक्षा अकादमी- नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी अर्थात एनडीए या सैन्याधिकारी तयार करणाऱ्या देशातील प्रतिष्ठीत संस्थेचं ढेकूण मारण्याचं काम मिळालं. काम इतकं चोख आणि प्रामाणिकपणे राजेन्द्रच्या कंपनीने केलं की थेट एनडीएच्या कमांडरने राजेन्द्रचं कौतुक केल. चोख काम करणारे म्हणून राजेन्द्रच्या जी. टी. पेस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ख्याती वाढली. पुण्यातील प्रसिद्ध नागरी वसाहत असणारे मगरपट्टा, टाटा मोटर्स, नांदेड सिटी, फोक्सवॅगन, जेसीबी, परांजपे बिल्डर सारख्या नामांकित कंपन्य़ाची कामे राजेन्द्रची कंपनी करते. पुण्यामध्ये २००८ साली कॉमनवेल्थ स्पर्धा झाली, त्यावेळची ही घटना. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील प्रतिष्ठित खेळाडू पुण्यात आले होते. पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली. मात्र या हॉटेलमध्ये २-३ उंदीर आढळल्याने हे हॉटेल आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे असा खेळाडूंचा समज झाला. त्यांनी आपल्या देशाच्या खेलप्रशिक्षक आणि व्यवस्थापकांशी चर्चा करुन हॉटेलची खोली बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हॉटेलची अन देशाची नाचक्की होणार होती. कोणीतरी उंदीर मारण्य़ाच्या कामासाठी राजेन्द्र गायकवाडांचं नाव सूचित केलं. मात्र कंपनी लहान आणि नवखी असल्याने कितपत यशस्वी याची कोणीच खात्री देत नव्हतं. मात्र राजेन्द्र गायकवाडांनी ऑर्किड हॉटेलचे मालक विठ्ठल कामतांशी चर्चा केली. कामाचं स्वरुप समजावलं. ७१ देशांच्या टीमलीडरशी बोलले. कामतांचं समाधान झाल्यावर कामतांनी त्यांना परवाने दिली. दिवसाला ३० ते ४० उंदीर मारु लागले. अशा प्रकारे २ दिवसांत संपूर्ण पंचताराकित हॉटेल उंदीरमुक्त केले. या अनुभवाने राजेन्द्रच्या कंपनीची वाहव्वा झाली. देशाची इभ्रत काही अंशी वाचवू शकलो याचं समाधान आयुष्यभराचा ठेवा म्हणून राजेन्द्राने जतन केला आहे.
थोडासा बदल म्हणून राजेन्द्र एक्सपोर्ट फ्युमिगेशन या व्यवसायात उतरले. बाहेरगावी जाणाऱ्या अथवा बाहेरगावाहून येणाऱ्या भालेपाज्या, फळभाज्या, अन्नधान्य वाहून नेणाऱ्या कन्टॆनर्सना निर्जंतुक करण्याचं काम राजेन्द्र करतात. २ कामगारांनिशी सुरु झालेल्या जी. टी पेस्ट कंट्रोल कंपनीत आज ७०० ते ८०० कर्मचारी काम करतात. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २५ कोटीहून अधिक आहे. नुकतेच नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे ६० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांना मिळालेले आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या कामामुळे आपण देशभरात कुठेही काम करु शकतो हा आत्मविश्वास त्यांना मिळाला. यातूनच आज गुजरात, मुंबई, पुणे, दिल्ली येथे गायकवाडांच्या कंपनीचे कार्यालये आहेत.
जिद्द उराशी बाळगून ध्येयाकडे वाटचाल केली कि प्रतिकूल परिस्थिती देखील अनुकूल होते किंबहुना ती अनुकूल बनत जाते. हेच आपल्याला राजेंद्र गायकवाड यांच्या उद्योजकीय प्रवासातून दिसून येते.
शब्दांकन : नमिता दोंदे
(पत्रकार)
..................................................
अर्न अॅण्ड
लर्न ते इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अफरमेटिव्ह अॅक्शन कंपनीचे सर्वेसर्वा - अफलातुन व
प्रेरणादायी प्रवास
श्री. सुनिल झोडे (MLM)
चेअरमन, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स
अफरमेटीव्ह अॅक्शन
श्री. सुनिल झोडे सर म्हणजे एक कमालीचं व्यक्तीमत्व, अत्यंत हसतमुख आणि समजूतदार, स्पष्टवक्ते तसेच आपल्या कामाशी निष्ठा असलेले एक हरहुन्नरी, यशस्वी, प्रेरणादायी व्यक्तीमत्व. सध्या ते एवढ्या मल्टीपल व्यवसायात कार्यरत आहेत की, दिवसागणिक तरुणांना विचारात पाडतील इतकं जबरदस्त काम ते न थकता अत्यंत उत्साहााने करीत आहेत.
इंडीयन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अफरमेटीव्ह अॅक्शनचे ते सर्वेसर्वा आहेतच त्याचबरोबर Conatire CISB Supplychain Sol. Pvt., LTB, Conatire Solutions Pvt. Ltd., International Airport Services Pvt. Ltd. lemes®e AGS-HPCL Domestic & Non-domestic LPG Distribution, Hindustan Pesticides -pest Management Professionals या सर्वांचेही नेतृत्व सुनिल झोडे अतीशय लीलया पेलाव्यात अशाच पद्धतीने यशस्वीरित्या सांभाळत आहेत. आजच्या या यशाविषयी त्यांच्याशी संवाद साधताना एक लक्षात आले की, हे सर्व यश लगेच त्यांच्या पदरी आले नाही तर यामागे प्रचंड मेहनत आणि संकटाशी दोन हात करत त्यांनी हे सारं उभारलं आहे. त्यांचं बालपण अत्यंत हलाखीत गेलं. तीव्र गरीबी असल्याने शिक्षण हा विषय लक्झरी होता. इयत्ता ४ थी पासून म्हणजे जेमतेम १०-१२ वर्षाचे असतानाच त्यांना नोकरी करावी लागली. 'अर्न अॅन्ड लर्न' पद्धतीत काम करुन शाळेची फी भरुन प्रथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केल. इयत्ता ७ वी पर्यंतचं शिक्षण वर्धा जिल्हयातील सागून गावात गेलं तर वर्धामध्ये त्यांच्या मोठ्या बंधूंना शिक्षकाची नोकरी लागली. त्यानंतर वर्धामध्ये भावाच्या मदतीने ११ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं मग त्यानंतर १२ वी साठी मुंबई गाठली. मुंबईला आल्यानंतरही फक्त शिक्षणाकडे लक्ष देता येत नव्हत आणि 'अर्न अॅण्ड लर्न' संकल्पना मनात इतकी रुजली की त्यांना शक्यही नव्हतं. त्यांनी करस्पाॅन्डन्स पद्धतीत शिक्षण घेऊन पॉलीट्री चा व्यवसाय १९८० च्या काळात काॅलेज करुन सुरु केला. अशा पद्धतीने काम करुन त्यांनी मास्टर ऑफ लेबर मॅनेजमेंट इथपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले आणि उद्योगाविषयी पहिली मुहुर्तमेढ रोवली. त्यांच्या यशाचा आलेख हा उंचवटा देणाराच आहे. त्यानंतर त्यांनी मोठी भरारी घेण्याच्या उद्देशाने गॅस एजन्सीचा व्यवसाय सुरु करुन मूळ प्रवाहात येण्याचे ठरवले. आणि त्यांचं ते ठरवणचं त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, “गॅस एजन्सीचा इंटरव्ह्यू देत असताना खुप दडपणाखाली होतो. त्यांनी मला आधीच्या व्यवसायासंदर्भात अनेक प्रश्न विचारले त्यांची मी योग्य उत्तरे देखील दिली. आधीच्या व्यवसायात म्हणजे पाॅलीट्रीच्या व्यवसायात खूप जोखीम असते. अंडयातून पिल्लू बाहेर येतं, त्याचं संगोपन करणं, संरक्षण करणं, त्याची तपासणी करणं आणि मार्केटमध्ये फुलफ्लेज चिकन तयार करुन देणं. त्या व्यवसायात खूप शिकण्यासारखं होतंचं. जेवढा खर्च कमी तेवढा फायदा जास्त याचं गणित किती योग्य समतोल साधलं हे जेव्हा गॅस एजन्सीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं त्याच क्षणी त्यांनी माझं कौतुक करुन मला पास केलं. त्या इंटरव्ह्युमूळे प्रेरणादायी टर्निंग पाॅईट आयुष्याला मिळाला, आत्मविश्वास वाटला आणि १९८२ साली पहिला स्वबळावर गॅस एजन्सीचा उद्योग सुरु करुन मुळ प्रवाहात प्रवेश केला,” सदर प्रसंग सांगताना सुनिल झोडे सरांचे डोळे अलगदरित्या पाणावलेले पाहिले आणि त्यांच्या या संघर्षाला सलाम करावासा वाटला.
इंडीयन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अफरमेटीव्ह अॅक्शन ही कंपनी बहूजन वर्गातील नवउद्योजकांसाठी, यशस्वी उद्योजकांसाठी पाॅलिसी एस्टॅब्लिशचे काम करते. देशामध्ये विशिष्ट महाराष्ट्र केंद शासन राज्यशासन याविषयी प्रयत्न करतेय परंतु तो वेग तरीही उद्योगधंदयासाठी असलेली इको सिस्टिम सपोर्ट सिस्टिम ही बाब मात्र पूर्ण होत नाही. ३ वर्षापूर्वी २ कोटी लोकांना नोकरी देणार अशी घोषणा दिली होती परंतु या घोषणेप्रमाणे किती झाले ? आपण जर उद्योगच निर्माण करु शकलो नाही तर नोकऱ्या कशा निर्माण होणार? सरकारने योजलेलेल्या योजनेला सपोर्ट करण्यासाठी बाकीच्या कंपन्या जशा काम करतात तसेच इंडीयन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अफरमेटीव्ह अॅक्शन कंपनी ही तेच काम करते. सरकारची पाॅलिसी बनवून ती राबवण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करीत असते पण सरकारची कागदावर असलेली पाॅलिसी जेव्हा मूळ लाभार्थी पर्यंत जाते तेव्हा ती अमलात आणणे फार कठीण असते. या सर्व समस्या सरकारपुढे मांडण्यासाठी विखुरलेला उद्योजक कमी पडतो त्यामुळे हवा तसा प्रेशरग्रुप तयार होत नाही. इंडीयन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अफरमेटीव्ह अॅक्शन कंपनी सरकार आणि उद्योजक यांचा दुवा बनुन एक ब्रीज तयार करते. बऱ्याचदा अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी बँकेतील कामकाज, कागदपत्र पूर्तता इ. गोष्टी कशा असाव्यात, योजना नक्की काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार काही अंशी कमी पडते त्यावेळी ही व्यक्ती उद्योग करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. अशा पद्धतीचे महत्वाचे कार्य सुनिल झोडे सर करत आहेत.
उद्योगाविषयी बोलताना त्यांनी एका महत्वाच्या समाजघटकावर आणि त्याच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. एखाद्या उद्योगामध्ये बिझ आॅफ पिरॅमिड वंचित घटक असतो. त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोचत नाहीत. तेथील व्यवस्थाही त्याच्यापर्यत त्या पोहोचू देत नाही. स्पर्धात्मक युगात वंचित समाजाला बेसिक गोष्टीसाठी अर्ध आयुष्य घालवावं लागतं तर अवंचित समाज जास्त सधन होत असतो. वंचित समाज आणि सधन समाज यांत खूप मोठी दरी निर्माण होत आहे. वंचित समाजामध्ये जनजागृती करुन स्टार्ट अप योजना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पाॅलिसी ओव्हर, मुद्र योजना या सर्व योजनांचा लाभ वंचित समाजाला करुन देणे फार गरजेचे आहे. येत्या काळात व्यवसायात तग धरुन राहण्यासाठी वंचित समाजाला आर्थिक पाठींबा पूरवण्याचं काम आपण सर्वांनी केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी व्यवसायाबरोबर आपली सामाजिक बांधिलकीही यावेळी व्यक्त केली.

‘उद्योजक बना....व्यवसाय करा,’ असा मूलमंत्र त्यांनी तरुणांना देताना त्यांनी उद्योजक होण्याचे तंत्र सांगितले, “उद्योजकाकडे नेतृत्व कला असणे फार महत्वाचे आहे आणि कमालीचा प्रमाणिकपणा. तुम्ही प्रमाणिक असाल तर तुम्ही स्थिर व्यवसाय करु शकता. तसेच संवाद साधा, सतत नवीन माणसे जोडा, सहनशीलता वाढवा, स्वत:वर आत्मविश्वास ठेवा आणि स्वत:तला मी पणा काढून फक्त आपल्या कामाशी एकनिष्ठ रहा”. हे सांगत असताना सुनिलजींकडे पाहिलं की हेच दिसतं की, ‘त्यांच्यातील माणसं जोडणे ही कला वाखाणण्याजोगी आहे,’ आत्मविश्ंवास आणि निर्णक्षमता, सहनशील तसेच नेतृत्व कला असा साऱ्यांचा मेळ त्यांच्या व्यक्तीमत्वाकडे पाहताना जाणवतं. त्यांचा मूलमंत्र ते स्वत:ही तितक्याच निेष्ठेने पाळताना दिसतात.
उद्योग करणे ही मानसिकता आपली असली पाहिजे. आताच्या काळात भांडवल मिळण्यासाठी अनेक योजना आहेत. भांडवल नसल्याने उद्योगात पडलो नाही या वाक्याला बगल देऊन उद्योजक तयार व्हायला हवेत. यश अपयश हे आयुष्यात येत असतात खंबीरपणे या सार्याला सामोरे जाणे आणि एखादा उद्योग करताना जोखीम आणि जुगार यात फरक करता आला पाहिजे. अपयशी झालात तरी निराश न होता अपयशाच्या कारणावर मात करुन पुन्हा उभे राहून उद्योग सुरु करायला हवा. आपल्या समोर आलेली कोणतीही संधी सोडू नका. प्रत्येक संधी आपलं आयुष्य बदलवू शकते. असे सांगताना त्यांनी एक उदा. सांगितले की, कोणताही व्यवसाय सुरु करायचा तर पहिले अडचणी येतातच, टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स हा उद्योग करताना स्थानिक व्यावसायिकांनी जबरदस्त विरोध करत स्पर्धा केल्या. पण मी त्यांना मिळून काय करता येईल ते ठरवलं आणि स्थानिक लोकांना यातून रोजगार मिळवून दिला. त्यानंतर इतर सहकारी सुद्धा माझ्यासोबत या व्यवसायात स्थिर झाले, ही कल्पकता आपल्यात असली पाहिजे अशा पद्धतीने सुनिल झोडे सर आपल्या उद्योगाचा फंडा इतर व्यावसायिकांना सांगून, सर्वांना एकत्र घेऊन हे काम पुढे चालवत आहे.
इंडीयन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अफरमेटीव्ह अॅक्शन ही कंपनी पुढे काही महत्वाच्या विषयांवर कार्यरत राहणार आहे. वंचित वर्गातून जास्तीत जास्त उद्याजक कसे तयार होतील त्यांच्यासाठी इकोसिस्टिम कशी राबवता येईल. भांडवल कमी पडू नये म्हणून बँक सपोर्ट सिस्टिम राबवणे, नवोदित उद्योजकांपर्यंत शासकीय योजना पुरवणे अनेकदा उद्योग उभा राहतो मार्केट मिळत नाही त्यासाठी मार्केटशी जोडणे, उद्योजकांना मेनस्ट्रीम उद्योगांशी जोडणे. मेनस्ट्रीम इंडस्ट्री आणि स्माॅल स्केल इंडस्ट्रीचा दुवा बनुन उद्योजकांना स्थीर करणे, देशाच्या जीडीपीमध्ये त्याचा वाटा वाढवणे, त्यांची इकाॅनाॅमिकल ग्रोथ निर्माण करणे आणि उद्योजकीय मानसिकता तयार करण्याचे काम येत्या काळात अजून प्रखरपणे करण्यात येणार असल्याची माहिती सुनील सरांनी सांगितली. त्यांच्या या अवाढव्य कामकाजात त्यांच्या कुटुंबाची मोठी साथ आहे. त्यांची पत्नी व दोन मुलं असा त्यांचा परिवार असून त्यांची पत्नी खांद्याला खांदा लावून उद्योग सांभाळत आहे. तर मोठा मुलगा ही त्यांचे व्यवसाय सांभाळत आहे. लहान मुलगा ब्रॅन्डींगमध्ये एमबीए करतोय. लवकरच त्याचंही प्रेडक्ट मार्केटमध्ये येत आहे अशा या कुटुंबाला उद्योगशील कुटुंब म्हणता येईल. सुनिल झोडे सरांच्या या यशस्वी वाटचालीचा मागोवा घेताना अनेक वेळा वाटलं की, सामान्यातला असामान्य व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल तुमच्यासारखे उद्योजक अनेक नवोदित उद्योजकांना त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यास मदत करतात. म्हणतात ना की, ‘मेहनत इतनी खामोशी से करो के कामयाबी शोर मचाने लगे!!’
शब्दांकन : नमिता दोंदे
(पत्रकार)



No comments:
Post a Comment